Wednesday, February 8, 2012

तीन प्रसंग......

चन्द्रपूर च्या ८५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी वार्तांकन करुन अमरावतीला परत येत होतो. संमेलन अत्यंत सुंदर झाल्यने आणि त्याचे वार्तांकन करण्याची संधी मिळाल्याने खुशीत होतो.माझ्या परिने पूर्ण प्रयत्न केले होते आणि त्यामुळे एक समाधान घेउन परतत होतो. जिल्हा परिषदेची निवडणूक असल्याने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत अशी माहिती मिळाली. अमरावतीसाठी थेट गाडी नाही हे कळल्यावर ब्रेक जर्नी करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. नाइलाजाने चंद्रपूर ते वणी बस पकडली आणि वणीला पोचलो. पुढची यवतमाळ पर्यंतची बस यायला वेळ होता त्यामुळे बस स्थानकावर वाट बघत बसलो. शेजारी बलदंड शरीरयष्टीचा एक प्रवासी बसला होता. खांद्यावरचा चौकड्यांचा मोठा रुमाल आणि बोलण्याची ढब यावरून तो मुस्लिम समाजाचा होता हे स्पष्ट होते. ओळख झाली अन गप्पा सुरु झाल्या. मराठी साहित्य संमेलन हा काय प्रकार आहे आणि ते कशाशी खातात हे त्याचा गावीही नव्हते. किंबहुना तशी अपेक्षाही नव्हती. मी पत्रकार आहे असे त्याला सांगितले तर त्याच्या चेहर्‍यावर पत्रकाराचे साहित्य संमेलनात काय काम अस भाव प्रगटला. गप्पा पुढे सुरु झाल्या.
"कमाई तो बहुत होगी आपको?" त्याने विचारले. "ठिक -ठाक पगार मिल जाता है" इति अस्मादिक. "नही, वैसी बाकीकी कमाई?" आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. " वो धंदा नही करते है हम. एम्प्लॉई है हम. पगार मिलती है हमको", मझ्यातला मानी पत्रकार उत्तरला.
"अच्छा अच्छा. नही मैने ऐसे हि पूछा. हमारे पैचान के है एक पत्रकार. उनकी अच्छी कमाई चलती थी," असे म्हणून त्याने त्याच्या मित्राचे नाव सांगितले जो माझ्या ही ओळखीचा निघला. त्याचे नाव ऐकून जरा चमकलो


पण आश्चर्य वाटले नही.
सध्या पत्रकारितेत हे नवीन राहिलेले नाही.
कट टू अमरावती. दुसर्‍या दिवशी ऑफ़िस मध्ये बसलो होतो. ओळखीचा एक पत्रकार आला. आणि माझ्या सहकार्‍याशी गप्पा करु लागला. "फ़ोन आला होता त्याचा. बातमी छाप म्हणे माझ्या फ़ेवर ची. त्याला म्हटल पैसे किती देशील, तर म्हणाला सांगतो. साले फ़ुकटात बातमी छापून पाहीजे."
" डायरेक्ट मागितले कारे पैसे?", माझा सहकारी. " हो त्यात काय आहे. हे कमवतात आणि आपण काय तसच रहायचे?". किती हा निर्मळ्पणा स्वभावाचा! अगदी स्वच्छ विचार!
कट टू दुसरा दिवस. सकाळी ९.३० ची वेळ. एक राजकिय पक्षाच्या पीआरओचा फोन होत. ''आम्ही तुम्हाला इतक्या रकमेच्या जाहिराती देणार आहोत. आणि एक लाख रुपये तुमच्या साठी, वैयक्तिक.,"
कोणताही विचार न करता मी शांतपणे उत्तरलो. "त्या जाहिराती द्या तुम्ही. असे पैसे मी घेत नाही. त्या पण रकमेच्या जाहिरातीच द्या तुम्ही".
आणि समोरचा माणूस उत्तरला," मला वाटलच होत तू नाही म्हणशील म्हणून". आणी मग आम्ही पुढे बोलू लागलो दुसर्‍या विषयावर.
तीन प्रसंग. पत्रकारितेला लाज आणणारे. आम्ही पत्रकार खरेच एवढे भिकारी झालो आहोत का?
मल कदाचित कुणी वेड्यात ही काढतील. कारण पैसे घेण्यात काही चूक नाही, अस मानणारे अनेक जण अहेत. तालुका स्तरापासून ते आव्रुत्त्या जिथून निघतात तिथपर्यन्त सगळीकडे आहे. कुणी चिडवतील ही मला अश्या फ़ालतू प्रामाणिकपणाबद्दल. पण मला माहीत आहे मी बरोबर आहे. हा किस्सा मी घरी सांगितल्या नंतर माझ्या घरच्यांच्या चेहर्‍यावर जो आनंद आणि अभिमान दिसला, तो अशा अनेक रुपयांपेक्षा मोठा आहे. आणि असा काहि मी एक्टाच नाही. अजूनही पत्रकारितेत अनेक प्रामाणिक माणस आहेत. चला आशा करु या, की ही संख्या सतत वाढत राहो.
ता.क. हा माझ्या प्रामाणिकपणाचा डंका नाही. तर वस्तुनिष्ठ वार्तांकन अहे. झालेल्या घटनांचे जसेच्या तसे.