दांतेवाडा घटनेने हादरलेल्या प्रशासन आणि शासनाला सावरायलाही वेळ न देता, नक्षलवाद्यांनी छत्तीसगढ मध्ये पुन्हा एक बस उडवून सर्वांना जोराचा धक्का दिला. या आणि अशा अनेक घटना घडल्यावर आपण नक्षल्यांवर टिका करतो आणि ते कसे चुकीचे आहेत हे स्वत: ला व इतरांना पटवून सांगतो. नक्षलवाद्यांचा मार्ग पटो अथवा न पटो, आपल्या प्रत्येकाच्या मनात एक कुतुहल त्यांच्या बद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल नेहमीच असते. आणि तरी सुद्धा कुठेतरी नक्षल्यांबद्दल मनात रागच जास्त असतो.
पिचलेल्या जनतेला न्याय देण्याच्या उदात्त भावनेतून चारु मुझुमदारांनी सुरु केलेली ही चळवळ आज, त्याच जनसामान्यांच्या विरोधात जात असुन त्यांच्यातच नवीन जमीनदार आणि बुर्ज़्वा लोक तयार होत आहेत. आज जरी या चळवळीची दिशा चुकली असेल आणि तिचे मार्गक्रमण हे दहशतवादी संघटनेकडे सुरु असेल, तरी जी परिस्थिती प्रखरपणे या चळवळीने जगापुढे आणली, ती परिस्थिती आज देखील कायम आहे, वेष्टन बदललेल्या स्वरुपात!
आज देखील सरकारी यन्त्रणेची मुजोरी तितकीच आहे, निर्ढावलेपणा तसाच आहे, माहिती अधिकार कायदा येउन सुद्धा त्यांचे छुपे व्यवहार व गरिबांना नाडणे तसेच सुरु आहे. अधिकारी, नेते, गुंड आणि उद्योगपती यांचे साटे लोटे तसेच सुरु आहे. प्रत्येक जातीतील ठराविक लोक सोडले तर अनेक जण 'वंचित' या एकाच जातीत सामावणारे आहेत. त्रास खेड्यातच आहेत असे नाही, ते शहरातही आहेतच, त्यांचे स्वरुप वेगळे असेल. आमच्या देशातील जे भाग १९४७ साली मागास होते, ते आजही मागास श्रेणीतच मोडतात. आहे रे आणि नाही रे यांच्यातील दरी विस्तीर्ण होत आहे. आमच्या देशातील सर्वच जाती समूहांना असुरक्षित वाटत आहे. अशी सर्व परिस्थिती ही नक्षलवादासाठी अत्यंत पोषक असते. याचाच अर्थ आमची शहरे देखील नक्षली गटांची ठिकाणे बनू शकतात. चळवळीला प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी तिला बुद्धिवंतांची साथ लाभणे आवश्यक असते. काही वर्षांपूर्वी विद्यापीठांमधून शिकणार्या कम्युनिस्ट व जहाल डाव्या विचारवंतांनी, कलावंतानी, साहित्यिकांनी नक्षल चळवळीला अशी वैचारिक साथ दिली होती. त्यामुळेच या चळवळीला तात्त्विक अधिष्ठान प्राप्त झाले; अन्यथा ती मुस्लिम दहशतवादी चळवळीच्या मार्गाने गेली असती. आज ती त्याच मार्गाने चाललेली आहे. तिला पुन्हा सुशिक्षित तरुणांकडून समर्थन मिळू द्यायचे नसेल तर सरकार प्रमाणेच अम्हालाहि काही तरी पुढाकार घेऊन करावे लागेल. सरकार ने विकास कामांना आदिवासी भागात गती दिली पाहिजे, सुविधा पुरवल्या पाहिजेत, सरकारी यन्त्रणा अधिक माणुसकीपूर्ण झाली पाहिजे, हे अत्यंत आवश्यक आहे. तसेच नागरिक म्हणून आपण काय करु शकतो याच देखिल प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. लहान पणापासून राष्ट्रवादाची भावना रुजविणे, सर्व काही मीच न ओढता वंचितांना काही देण्याची तयारी ठेवणे, त्या वंचितांपर्यन्त पोचण्याची, जाण्याची तयारी ठेवणे आणि नक्षली चळवळीला समर्थन करणार्यांचा विरोध करणे, आपापल्या ठिकणी हे आपण नक्कीच करु शकतो. गडचिरोलिला जाऊन एक वेगळे टुरीजम करणे, ख्रिश्चन मिशनर्यांच्या पैश्यावर पोसलेल्या आपल्या देशद्रोही मिडियाचा विरोध करणे हे ही आपण करु शकतो. हे खूप सोपे उपाय झालेत. काही उपाय आपण ही सुचवू शकता. मला अपेक्षा आहे प्रतिक्रियांची आणि ऊपायांची! वाट बघतो आहे!
-------------------------------------------------------
Tuesday, May 18, 2010
Subscribe to:
Posts (Atom)